पिंपरी : राजरोसपणे हुक्का सुरु असलेल्या सुसगाव येथील मकाऊ हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. त्यात पोलिसांनी १२ हजार ३०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. नवनाथ भारत मोरे (२६, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई ए. ए. शेख यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ याने विनापरवाना, बेकायदेशीरपणे त्याच्या हॉटेलमध्ये हुक्का पॉट व हुक्का फ्लेवरची विक्री केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शनिवारी दुपारी हॉटेलवर छापा मारून दोन हजार ८०० रुपयांचे चार हुक्का पॉट, चार हुक्का पाईप तसेच ९ हजार ५०० रुपयांचे सात हुक्का फ्लेवर बॉक्स असा एकूण १२ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.