मुंबई : “पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे चे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी, खोकला व ताप आहे. त्यामुळे जबाबदारी स्वीकारुन विलगीकरणात आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे आवाहन पंकजा मुंडे यांनी ट्विट करत केलं आहे.
ताप, सर्दी, खोकला ही कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत. पंकजा मुंडे यांना ही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःला आयसोलेट (विलगीकरण) केलं आहे. मात्र, अद्याप त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत वेगळी चूल मांडली. तर बीडमधील माजी खासदार आणि मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचारही जयसिंगराव गायकवाड यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.