मागील काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत, अशा चर्चा होत्या. विधान परिषदेमधील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत शिवसेना पक्षाच्या कोट्यातून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. नंतर, खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले की, उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शेवटी तो दिवस उजाडला आणि त्यांना मराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेना पक्षा शिवबंधन बांधून प्रवेश केला. यानिमित्ताने त्यांच्या अभिनयाच्या करिअरपासून राजकारणापर्यंत केलेल्या प्रवासावर थोडक्यात नजर टाकू…
खरंतर मागील वर्षापासून बाॅलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. नव्वदीच्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. एक मराठी मुलगी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रस्थापित घराणेशाही असणाऱ्या चित्रपटविश्वात स्वतः वेगळा ठसा उमटविला. मागील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काॅंग्रेस पक्षाकडून त्या उतरल्या होत्या. मात्र, भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना काॅंग्रेसला रामराम ठोकला आणि राजकारणालाच टाटा-बाय-बाय करून सन्यास घेण्याचा विचार जाहीर केला. मात्र, त्यांना पुन्हा चाहूल लागली ती राजकारणाची!
एक बालकलाकार म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९८० साली पहिल्यांदा त्यांनी मराठीतील सर्वोत्तम अभिनेते श्रीराम लागू यांच्यासोबत ‘जाकोल’ चित्रपटात काम केले. त्यावेळी उर्मिला यांचे वय केवळ ६ वर्षे होते. १९८३ साली आलेल्या ‘मासूम’ चित्रपटातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ‘लकडी की काठी, काठी पे घोडा’, हे गाणं सुपरहीट झाले होते.
१९८९ साली ‘चाणक्यन’ या मल्याळम चित्रपटात त्यांना मुख्य पात्र साकारण्याची संधी मिळाली. यामध्ये कमल हसन होते. हा चित्रपट सुपरहीट ठरला. एक हिरोईन म्हणून त्यांना ‘नरसिम्हा’ या चित्रपटात पहिली संधी मिळाली. राम गोपल वर्मा यांच्या ‘रंगीला’ चित्रपटात उर्मिला यांनी मुख्य पात्र साकारले आणि हा चित्रपट उर्मिला यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला. याच चित्रपटातून ‘रंगीला गर्ल’ अशी ओळख मिळाली.
उर्मिला यांची ओळख ही बोल्ड अभिनेत्री म्हणूनही राहिलेली आहे. एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी दिलेले आहेत. सत्या, दौड, कौन, मस्त, जंगली, प्यार तूने क्या किया, जुदाई, भूत, पिंजर, एक हसिना, अशा अनेक चित्रपटांतून उर्मिला यांना मोठ यश मिळालं. २०१८ मध्ये आलेल्या ‘ब्लॅकमेल’ चित्रपटात त्या प्रेक्षकांना दिसल्या, त्यात त्यांनी आयटम साॅंग केलेले होते. २०१६ मध्ये उर्मिला यांनी आपल्या वयापेक्षा १० वर्षांनी छोटे असणारे मोहसिन अख्तर यांच्याशी विवाह केला. मोहसिन अख्तर हे काश्मीरमधील माॅडेल आणि मोठे उद्योजक आहेत.
-राधिका पार्थ