नवी दिल्ली : ब्रिटन सरकारने करोना प्रतिबंधक लस पुढीलआठवडयापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही लस टोचून घेण्यासाठी भारतीयांनी यूकेला जाण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्सकडे विचारणा सुरु केली आहे.
यूकेमध्ये सुरु होणाऱ्या लशीकरण मोहिमेचा लाभ घेता यावा, यासाठी एका ट्रॅव्हल एजंट भारतीयांसाठी खास तीन नाईट पॅकेजची आखणी करत आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली आहे.
करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती. करोना लस टोचून घेण्यासाठी यूकेला जाण्यासंदर्भात बुधवारी काही लोकांनी विचारणा केली असे मुंबई स्थित एका ट्रॅव्हल एजंटने पीटीआयला सांगितले.
“यूकेमध्ये भारतीयांना करोना प्रतिबंधक लशीचा डोस मिळेल हे आताच सांगणे खूप घाईचे ठरेल. वयोवृद्ध, आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस मिळणार आहे” असे या एजंटने त्याच्याकडे यूके टूरसाठी विचारणा करणाऱ्यांना सांगितले.