पुणे : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत २५ बड्या कंपन्यांनी ६१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. पुणे, सातारा, रायगड, धुळे, पालघर, औरंगाबाद, जळगाव, नगर, कोल्हापूर, ठाणे, अमरावती आदी जिल्ह्यांत हे उद्योग लवकरच उभे राहणार आहेत. यातील सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यात येत आहेत. सात उद्योगांनी पुण्याला पसंती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत मंगळवारी झालेल्या करारात पुणे जिल्ह्यात सात कंपन्यांनी तीन हजार ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. त्यातून तब्बल २८ हजार ८७० रोजगार निर्माण होणार आहेत.
पुण्यात येणाऱ्या उद्योगामध्ये गोयल गंगा, जीजी मेट्रोपोलिस, ग्रावीस, बजाज ऑटो, ॲम्प्स फार्मटेक्स इंडस्ट्रीज, सोनाई इटेबल इंडिया, क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी या कंपन्यांचा समावेश आहे. गोयल गंगा आणि जीजी मेट्रोपोलिस यांनी आयटी पार्कमध्ये गुंतवणूक केली आहे. पुणे शहरात त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून २५ हजार नोकऱ्या आयटी सेक्टरमध्ये निर्माण होणार आहेत.