पुणे ः करोना संक्रमण काळातील संशोधनात देशाचा सहभागी कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण, करोना काळात (जाने-ऑक्टो) जागतिकस्तरावरील शास्त्रज्ञाचे आणि संशोधकांचे एकूण १ हजार ७५४ शोधनिबंध पबमेडमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यातली ८४ शोधनिबंध भारतातील शास्त्रज्ञांचे आणि संशोधन संस्थांचे आहेत. त्यामधील फक्त १० शोधनिबंध हे करोनासंबंधी मूलभूत संशोधन आणि चिकित्सक अभ्यासाशी संबंधित आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष आणि आयुष टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. भूषण पटवर्धन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील डॉ. सारिका चतुर्वेदी यांनी जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटेग्रिटिव्ह मेडिसिन या संशोधनपत्रिकेसाठीच्या ‘इंडिया इन कोविड १९ टाइम्स : मॉडर्न अँड वायजर’ या शीर्षकाच्या संपादकीयमध्ये वरील आकडेवारी दिली आहे.
आधुनिक विज्ञान पद्धत्तीबाबतचे पुरेसे प्रशिक्षण आयुष व्यावसायिकांकडे नाही. त्याचबरोबर निधी, स्त्रोत आणि पायाभूत सुविधांचा आभाव आहे. त्याचबरोबर भारतीय शास्त्रज्ञ आयुष प्रणालीबाबत संशोधन करण्यासाठी उत्सुक नाहीत, असे मत संपादकीयमध्ये मांडले आहेत. करोनाकाळात भारतातील वैज्ञानिक समुदायाने जागतिक संशोधनामध्ये दिलेले योगदान कमी आहे, असे जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटेग्रिटिव्ह मेडिसिन या संशोधन पत्रिकेसाठीच्या संपादकीयमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.