नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढत असून गेल्या 24 तासात 3900 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.अमेरिकेमध्ये कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे तरी ही कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत.
अमेरिकेनंतर हिंदुस्थानात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. देशात 1.02 कोटीवर कोरोनाबाधितांची संख्या गेली आहे.त्यातील 2.57 लाख एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 98.60 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे हिंदुस्थानात 1.48 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत 17,20,49,274 कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिका, हिंदुस्थान, ब्राझील, रशिया आणि फ्रान्स या देशांना कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. तर हिंदुस्थानात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.99 टक्के आहे. तर 1.45 टक्के मृत्यूदर आहे. देशात नवव्या दिवशी अॅटिव्ह रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी आहे. हा एक दिलासा आहे.