मुंबई : आरोग्यास खूपच हानिकारक असणारी हवा म्हणजेच प्रदूषण मुंबईत झाले असून दिल्ली प्रमाणे मुंबई शहराची पातळी घातक होऊ लागली आहे. अपायकारक हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी पुणे शहरामध्ये सध्या ‘उत्तम’ स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत बाहेर पडताना प्रदूषणविषयक मास्क वापरण्याचा आणि श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’ या विभागाच्या दैनंदिन अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. मुंबईच्या हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण ३११ मायक्रॉनपर्यंत गेले होते. दिल्लीमध्ये ते ३५३ मायक्रॉन इतके होते.
त्यामुळे मुंबई आणि दिल्ली ही शहरे सध्या प्रदूषणकारी कणांच्या प्रमाणामध्ये एकाच गटात आहेत. मुंबईच्या अनेक भागांत किमान तापमान कमी होऊन २० अंशाखाली गेले. गेल्या चार दिवसात सांताक्रूझ केंद्रावरील किमान तापमानात चार अंशानी घट झाली. तुलनेने कुलाबा येथील किमान तापमानात मोठी घट झाली नाही.