मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तर विदर्भात कोरोना वाढीचा दर सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. नागरिक सुरक्षितता पाळत नाहीत, नियमाचे पालन केले जात नाही, यामुळे कोरोना वाढत आहे. जर नियम पाळले जात नसतील तर पुन्हा लॉकडाऊनकडे जाण्याची शक्यता आहे, असा अलर्ट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
मुंबई मध्ये लोकल सुरू झाल्याने कोरोना वाढत आहे, असं सध्या म्हणणे योग्य नाही. पुन्हा लोकल बंद करणे हा शेवटचा पर्याय आहे. 28 तारखेला आरोग्य भरती सुरू होणार आहे. सध्या 50 टक्के भरती होणार आहेत. मार्चपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होईल अशी योजना आहे. यामध्ये 17 हजारांपैकी 8500 जागा भरल्या जातील.
राज्यात सर्व विभागातील ज्या भरती होणार त्यापैकी फक्त 50 टक्के जागा भरल्या जातील. उरलेल्या जागा या आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर लगेच भरल्या जातील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता आतापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा हात-पाय पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आपल्याकडेही पुन्हा लॉकडाऊन लागू करणार का? याबाबत शक्यता व्यक्त केली जात आहे.