कोल्हापूर : कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूरात निर्बंधांची पुन्हा कडक अंमलबजावणी राबविण्याच्या द़ृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांची बेफिकिरी आणि वाढती रुग्णसंख्या, याबाबत चिंता व्यक्त करत यापूर्वीच्या निर्बंधांची पुन्हा कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले.
सभा, आंदोलने, मिरवणुकांना परवानगी देऊ नका. विवाह समारंभातील उपस्थिती तपासा. विवाहासाठी पोलिस परवानगी आवश्यक राहील. विवाह सोहळा तसेच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तसेच मास्कचा वापर होत नसेल, तर दंडात्मक कारवाई करा. नियमांचे पालन न करणारे संबंधित हॉल, सभागृह, मंगल कार्यालये सील करा, असेही आदेश या बैठकीत देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातही सध्या कायम असलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
विवाहासाठी पोलिस परवानगी घेणे, 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडणे. हॉटेलमध्येही रात्री 10 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50 टक्के लोकांना प्रवेश देणे, यात्रा, जत्रा, उत्सव पोलिस परवानगीखेरीज आयोजित करता येणार नाहीत तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य राहील, विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत खुली ठेवणे बंधनकारक राहील आदी निर्बंध यापूर्वी घातले जाणार आहेत.