या गृहप्रकल्पाची रेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली असून रेराकडील नोंदणी प्रमाणपत्र दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झाले आहे. या सदनिका विक्रीसाठी म्हाडाकडील ऑनलाईन लॉटरी सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. ही लॉटरी प्रक्रिया संनियंत्रण करण्यासाठी आयटी व प्रशासनातील तज्ञ व्यक्तीची समिती स्थापन करण्यात आली आहे.
या गृहप्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत मध्यवर्ती भागात अल्प किंमतीत सर्व सोयींनी युक्त गृहसंकुल, आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी 29.55 चौ.मी. चटई क्षेत्राच्या तर अल्प उत्पन्न गटासाठी 59.27 चौ.मी. चटई क्षेत्राच्या सदनिका उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी 140 दुकाने, एकूण 52 हेक्टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्टर क्षेत्रावर योजना प्रस्तावित आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असून 11 मजल्याच्या एकूण 45 इमारती इथे होणार आहेत. भूकंप प्रतिबंधित बांधकाम व आधुनिक ॲल्यु फॉर्म पध्दतीचा वापर करुन मजबूत व जलद बांधकाम, शाळा, हॉस्पिटल, भाजीमंडई, शॉपिंग कॉम्प्लेक्स हाकेच्या अंतरावर, प्राथमिक शाळेची सुविधा प्रकल्पाजवळ आहेत.
सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल्स ॲन्ड स्कर्टिंग, एम.एस. बॉक्स प्रकारच्या खिडक्या, बाथरुम मध्ये ॲन्टी स्किड खिडक्या तसेच 7 फूटापर्यंत टाईल्स, टॉयलेटसाठी 3 फुटापर्यंत टाईल्स, गेनाईट किचन ओटा, स्टेनलेसस्टिल सिंकसह, सदनिकेस आतील बाजूस ऑईल बाऊंड पेंट व बाहेरील बाजूस ॲपेक्स पेंट, सोलर वॉटर हिटरची सोय, इमारतीत कॉमन लाईटसाठी सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा, प्रत्येक इमारतीत 2 स्ट्रेचर लिफ्ट व 2 जिने, गॅस पाईपलाईन (प्रस्तावित) आणि प्रत्येक इमारतीस फायर फाईटींग सिस्टम अशा सोयीसुविधा असणार आहेत.
ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी व ऑनलाईन पेमेंट तसेच NEFT/RTGS द्वारे चलन स्वीकृतीची मुदत 30 मार्च 2021 पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत राहील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिध्दी 5 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी 9 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी कार्यालयात सोडत होईल. सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
सदनिकांसाठी अनुक्रमे अल्प उत्पन्न गटाकरिता व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसकरिता पुढीलप्रमाणे वर्गवारी राहील. सर्वसाधारण – 1176-2487, अनुसूचित जाती- 172-365, अनुसूचित जमाती- 94 -199, विमुक्त जाती- 23-50, भटक्या जमाती-23-50 आणि दिव्यांग-78-166.
ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील HDFC बँकेच्या 23 शाखांमध्ये तसेच प्राधिकरणाचे जुने कार्यालय, पेठ क्र. 24, लोकमान्य टिळक चौक, निगडी, पुणे येथे हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध आहे. HDFC बँकांची यादी प्राधिकरण कार्यालयाच्या www.pcntda.org.in या संकेतस्थळावरील माहिती पुस्तकातील परिशिष्ट 3 मध्ये उपलब्ध होईल.
फॉर्म फी व अनामत रक्कम इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, क्रेडीट/डेबीट कार्ड अथवा रोख स्वरुपात भरता येईल. अर्ज भरण्यापूर्वी अधिक माहितीसाठी www.pcntda.org.in अथवा http://lottery.pcntda.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा [email protected] या ईमेल, हेल्पलाईन क्रमांक 1800209180, HDFC हेल्पलाईन क्रमांक 020-27655513 यावर संपर्क साधावा, असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी कळविले आहे.