सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाला लुटणारी टोळी अटकेत

0

सातारा : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून, तरुणाला लुटणाऱ्या युवतीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढत लुटमारीचे प्रकार घडत आहेत. अशाच पध्दतीने डिसेंबर महिन्यात साताऱ्यातील एकास ठोसेघर परिसरात बोलावून लुटण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तपासाच्या सुचना सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या. त्यांनी उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, राजेंद्र वंजारी, मालोजी चव्हाण, विश्‍वनाथ आंब्राळे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

या पथकाने पुणे तसेच बारामती परिसरात या टोळीचा शोध घेण्याचे काम सुरु केले. शोधादरम्यान त्यांनी बारामती (जि.पुणे) येथील करावागज गावातून वैभव प्रकाश नाळे (28) आणि अजिंक्‍य रावसाहेब नाळे (23) या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी सातारा तालुक्‍यातील ठोसेघर येथे गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात एकास बोलावून त्याच्याकडील सोने, चारचाकी, रोकड सुटल्याचे तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याची कबुली दिली. चौकशीत त्यांनी महिला साथीदाराचे नाव सांगितले. यानुसार पोलिसांनी हवेली (जि.पुणे) येथील थेउर परिसरातून 28 वर्षीय युवतीस ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी फेसबुक, व्हॉटसऍपवर ओळख काढत त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून बारामती परिसरातील अनेकांना लुटल्याची कबुली दिली आहे. कारवाईत सहभागी झालेल्यांचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.