‘या’ भूमिकेसाठी मी खासदार उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्यासोबत

0
सातारा : खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खेड शिवापूर टोल नाक्यावर एमएच 12 आणि एमएच 14 या वाहनांसाठी टोलमाफी करण्यात आली. याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील आनेवाडी, तासवडे टोलनाक्‍यांवर निर्णय घेऊन एमएच 11 व एमएच 50 या वाहनांना टोलमाफी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांनी निर्णय घ्यावा, त्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतल्यास मी शंभर टक्के खासदारांसोबत असेन, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

उदयनराजे यांनी टोलबाबत नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. या भूमिकेचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वागत केले आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले, की सेवा रस्ते आणि महामार्गाची दुरवस्था, स्थानिकांसाठी टोल सवलत आदी प्रश्‍नांसाठी वारंवार आंदोलने झाली आहेत. टोलनाके हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. रस्त्यांची दुरुस्ती, टोलमध्ये सवलत आदी प्रश्‍नांबाबत जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला हे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्‍न सोडवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

खेड- शिवापूर येथील टोलनाक्‍यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत मिळावी, म्हणून खासदार सुळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन स्वत:च्या पातळीवर हा प्रश्‍न सोडवला. त्यामुळे एमएच 12 व एमएच 14 पासिंग असलेल्या वाहनांना टोलमाफी मिळाली. टोलनाक्‍यांवरील भ्रष्टाचार बंद होणे आणि स्थानिकांना टोलमाफी मिळणे अत्यावश्‍यक आहे. खासदार सुळे यांच्याप्रमाणे साताऱ्यातील दोन्ही खासदारांनी आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्‍यांवर एमएच 11 व एमएच 50 पासिंग असलेल्या वाहनांना टोलमाफी मिळण्यासाठी भूमिका घ्यावी. वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तर आमदार म्हणून मी शंभर टक्के खासदारांसोबत राहून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सहकार्य देईन, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.