शहरात अवैध धंद्यानी धुमाकूळ घातला असून शहरात मटका,गुटखा व हुक्का पार्लर या तिघांडाना ऊत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून शहरातील तरुण पिढीवर याचा विपरीत परिणाम होत आहे. अन्न-भेसळ अधिकारी, स्थानिक प्रशासन व पोलीस अधिकारी या अवैध धंद्यांविरोधात मूग गिळून गप्प बसले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.शासनाने जरी गुटख्यावर बंदी घातली असली तरी कल्याणच्या स्टेशन परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर बिनदास्तपणे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे तसेच एका दुकानातुन गुटखा हा अनेक ठिकाणी पुरवला जात आहे.गुटखा हा शरीराला घातक आहे,त्यामुळे मौखिक रोग बळावत आहेत तसेच त्यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे याचा परिणाम युवा पिढीवर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे.शहरात गुटखाकिंगकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत असून या मागे अन्न-भेसळ प्रशासन व स्थानिक पोलीस यांचा आशीर्वाद असल्याने राजरोसपणे,खुलेआम सर्व प्रकारच्या गुटख्याची जागोजागी विक्री होत आहे.कायद्याची अंमलबजावणी करणारेच आपले हात ओले होताच त्यांना मोकळीक देतात असा सनसनाटी आरोप स्थानिक नागरिक करताना दिसतात.
भारतीय दंड संहितेच्या कलम २७२ अन्वये (विक्रीयुक्त पदार्थामध्ये भेसळ करणे), कलम २७३ (अपायकारक व विषारी पदार्थाची विक्री करणे), कलम ३२८ (विषारी पदार्थ देऊन व्यक्तीला इजा पोहोचवणे) व १८८ (सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे) यानुसार गुटका विक्रेता तसेच गुटख्याची तस्करी करणाऱ्या वर फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो तसेच अन्न व सुरक्षा मानक कायद्यानुसार देखील कारवाई करता येते,असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.असे असतानाही कुठल्याही प्रकारची ठोस अशी कायदेशीर कारवाई होताना अन्न-औषध प्रशासन व पोलीस विभागाकडून दिसून येत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे.कल्याण शहरात चालणारा गुटखा विक्री व्यवसाय,गुटखाकिंग व त्यांचे पालणकर्ते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ‘श्रमिक पत्रकार संघा’चे अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री,अन्न व औषध प्रशासन मंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त व अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.