वाढत्या कोरोनामुळे नववीपर्यंतच्या सर्व शाळा, क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद

0

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कडक 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील नववीपर्यंतच्या सर्व शाळा, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर, टायपिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. निवासी शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा, दहावी व त्यापुढील सर्व महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू ठेवण्यास परवानगी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अंत्यविधीच्या कार्यक्रमास 20 व्यक्तींना सामाजिक अंतराची अटीवर परवानगी असेल.

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात पुन्हा वाढू लागला आहे. मध्यंतरी काही शाळांतील विद्यार्थी बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध कडक करणे आवश्‍यक झाले आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश लागू केले. त्यामध्ये जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू असून, त्यामध्ये अत्यावश्‍यक सेवा व महामार्गावरील वाहतूक वगळण्यात आली आहे. उद्यापासून (गुरुवार) 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील नववीपर्यंतच्या सर्व शाळा, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूट बंद राहणार आहेत.

निवासी शाळा, वसतिगृहे, आश्रमशाळा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, दहावी व त्यापुढील सर्व वर्ग, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था चालू ठेवण्यास परवानगी असेल. या कालवधीत ऑनलाइन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण उपक्रम, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, उद्योजकता आणि लघुव्यवसाय विकास संस्था सुरू राहतील. त्यासाठी नियमावलीचे पालन करणे आवश्‍यक आहे. सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम, यात्रा- जत्रा आदी कार्यक्रम व परिषदा बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदी सेवनास मनाई असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.