न्यूयॉर्क: अमेरिकेतील कोलोरॅडो प्रांतात एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला असून यामध्ये 10 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलोरॅडोच्या बोल्डर परिसरातील एका सुपरमार्केटमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. परंतु, पोलीस यावर फार काही बोलण्यास तयार नाहीत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुपरमार्केटमध्ये सुरुवातीला गोळीबाराचा आवाज आला.
या गोळीबारात स्थानिक पोलीस अधिकारी एरिक टेली यांचा मृत्यू झाला. ते 2010 पासून पोलीस दलात कार्यरत होते. सुपरमार्केटमध्ये गोळीबार झाल्याचे समजले तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सध्या ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरु आहे. मात्र, याप्रकरणाचा उलगडा होण्यासाठी काही दिवस लागतील, अशी प्रतिक्रिया पोलिसांकडून देण्यात आली.
या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येत सुपरमार्केटच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला. स्थानिक पोलिसांच्या मदतीला 3 हेलिकॉप्टर्सही देण्यात आली होती. सुपरमार्केटच्या समोरच्या बाजूच्या काचेच्या खिडक्या फुटल्या होत्या. यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला शरण येण्यास सांगितले व त्याला ताब्यात घेतले.