पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणा-या तरुणाला सात वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला.
केतन संजय कोकाटे (२४, रा. रेंजहिल्स खडकी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. सरकारी वकील सुनील मोरे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी दहा साक्षीदार तपासले.
खटल्यात पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल, वयाचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरीत न्यायालयाने केतन याला शिक्षा सुनावली. २६ मे २०१४ रोजी हा प्रकार घडला होता. आरोपीने फिर्यादी यांना माझे तुमच्या मुलीवर प्रेम असून तिच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, असे सांगितले होते.
मात्र फिर्यादींनी आरोपीला मुलगी शिकत असून लग्न करून देण्यात नकार दिला होता. त्यावेळी आरोपीने मुलीला पळवून नेईन, अशी धमकी फिर्यादी यांना दिली होती. त्यानंतर त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे