अमरावती : अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या वडुरा जंगल परिसरात अभियांत्रिकीला शिकणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा अतिशय निर्दयीपणे गळा चिरुन खून झाला असून अभियांत्रिकीलाच शिकणारा १९ वर्षीय तरुण त्याच ठिकाणी गंभीर अवस्थेत पडून होता. हा थरार बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. १०) सकाळी समोर आला.
संजना शरद वानखडे (१९, रा. परतवाडा) असे मृत तरुणीचे तर सोहम गणेश ढाले (१९, रा. परतवाडा) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. सोहम ढालेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘ब्रेकअप’च्या कारणातून हे हत्याकांड घडले असून, मृत तरुणीचा वर्षभरापासून मित्र असलेल्या अभियांत्रिकीच्याच तरुणाने हे कृत्य केल्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही बडनेरा येथील न्यू राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेजला ‘आयटी’च्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.
तरुणीच्या गळ्यावर पाच वार असून ते वार कटरने केल्याप्रमाणे दिसत आहेत. दरम्यान, तरुणीने मारेकऱ्याचा प्रतिकार केला असून, त्यामध्ये तिच्या बोटांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अतिशय क्रूरतेने तरुणीचा खून करण्यात आला आहे. तरुणीचे वडील निवृत्त पोलिस अंमलदार असून ते दोन महिन्यांपूर्वीच अमरावती ग्रामीण पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत, अशी माहिती बडनेरा पोलिसांनी दिली.