औरंगाबाद : वाळुंज हद्दीतून वाळू वाहतूक करण्यासाठी व वाहनावर कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला ५ हजार रुपये हप्त्याची मागणी करुन ५ हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका पोलीस निरीक्षकाला अटक केली आहे.
जनार्दन सुभाष साळुंखे (वय ४२) असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. औरंगाबाद शहरातील वाहतूक शाखेच्या वाळुंज येथे त्यांची नियुक्ती होती.
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या मालकीच्या हायवाने वाळूची वाहतूक वाळुंज हद्दीतून करु देण्यासाठी व हायवा ट्रकवर कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे याने दरमहा ५ हजार रुपये हप्ता मागितला होता. या तक्रारीची पडताळणी शुक्रवारी करण्यात आली. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना जनार्दन साळुंखे याला पकडण्यात आले.