अहमदनगर : आयकर विभागातून बोलत असल्याचे सांगत लष्करी जवानाची 8 लाख 46 हजार 358 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
मूळचे हरियाणा येथील रहिवासी व सध्या नगरच्या आर्मड कोअर सेंटर ए. सी. डेपो भिंगार कॅण्टोन्मेंट येथे लष्करात नियुक्त असलेल्या जवानाने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यांच्या मोबाईलवर 30 एप्रिल 2022 रोजी एका मोबाईलवरून फोन आला. आपण आयकर विभागातून बोलत आहोत. तुमचे आयकर विभागाचे 12 लाख रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. ते तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हाला जीएसटी भरावा लागेल, असे त्याने सांगितले. त्यानंतर 7 वेगवेगळ्या मोबाईलवरून त्यांच्याशी सातत्याने संपर्क करीत त्यांचा विश्वास संपादन केला.
लष्करी जवानाने त्या तोतया आयकर अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार त्याच्या बँक खात्यात 30 एप्रिल ते 30 ऑगस्टदरम्यान वेळोवेळी ऑनलाईन 8 लाख 46 हजार 358 रुपये पाठविले. त्यानंतर सदर तोतया अधिकाऱयाचा संपर्क बंद झाला. लष्करी जवानाने त्यांच्याशी वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लष्करी जवानाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तोतया आयकर अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले तपास करीत आहेत.