हैती : अमेरिकेजवळील अटलांटिक महासागरातील हैती या देशामध्ये शनिवारी 7.2 रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला आहे. यामध्ये आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2800 पेक्षा जास्त जण जखमी आहेत. येथील परिस्थिती आणि भूकंपाची तिव्रता पाहता मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच कोरोना महामारीचा सामना करत असताना हैतीवर भूकंपामुळं आणखी एक मोठं संकट ओढावलं आहे. अमेरिकेकडून हैतीमध्ये मदत पोहचली असून बचावकार्य वेगानं सुरु झालं आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून 125 किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून सांगण्यात आलं आहे. भूकंप इतका शक्तीशाली होता की, घरं पत्त्यासारखी कोसळली.
या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. आधीच करोना संकटाचा सामना करणाऱ्या हैतीच्या नागरिकांचं भूकंपामुळे जिवन विस्कळीत झालं आहे. त्यातच झालेली राष्ट्रपतींची हत्या आणि वाढत्या गरीबीमुळे देशाचं संकट वाढत चाललं आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे ५.२७ वाजता अमेरिकेच्या आलास्कामध्येही भूकंपाचे झटके बसले होते. त्याची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल होती.
या शक्तीशाली भूकंपामुळे 800 पेक्षा जास्त घरं जमिनदोस्त झाली आहेत. तर शेकडो घरांना तडे गेले आहेत. पंतप्रधान एरियल हेनरी यांनी नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच महिनाभर देशात आपतकालीन स्थितीची घोषणाही त्यांनी केली आहे.