इंदूर : इंदूर येथील एका मेडिकल कॉलेज मध्ये रॅगिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रॅगिंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी एक शक्कल लढवली. यासाठी एका महिला पोलिसांनी रंगेहाथ रॅगिंग करणाऱ्या गॅंगला ताब्यात घेऊन कारवाई केली. या कामगिरीमुळे तिचे पोलीस विभागातही त्यांचे कौतुक होत आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील महात्मा गांधी स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर, एक महिला पोलीस हवालदार विद्यार्थिनी म्हणून महाविद्यालयात दाखल झाली. त्यावेळी तिने रॅगिंगचे आरोपी पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शालिनी चौहान असे या महिला पोलिसाचे नाव असून तिचे वय अवघे 24 वर्षे आहे. आरोपी विद्यार्थ्यांना कोणतीही शंका न घेता शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले होते.
या वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याची घटना समोर आली होती, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हेल्पलाइनवर तक्रारही केली होती. या प्रकरणाची दखल घेत संयोगितागंज पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी गुप्तहेर पथक तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये शालिनी चौहान यांचा समावेश होता.
या प्रकरणाचे नेतृत्व एसएचओ तहजीब काझी आणि उपनिरीक्षक सत्यजित चौहान करत होते. आरोपी विद्यार्थ्यांची ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांना भेटणे आणि त्यांचे वर्तन जाणून घेणे महत्त्वाचे होते. या कामासाठी शालिनी चौहानची निवड करण्यात आली. तिने हे काम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलं. विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्यासाठी ती कॅन्टीनमध्ये बराच वेळ घालवत असे, कनिष्ठ विद्यार्थ्यांशी खूप संवाद साधत असे. काही वेळातच तिने वरिष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून रॅगिंगसारख्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखले. आतापर्यंत 10 आरोपींची ओळख पटली असून 6 विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली आहे. शालिनी सर्वांशी हसतमुखाने बोलत असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. या कारणास्तव, तिला हे प्रकरण त्याच्या निष्कर्षापर्यंत नेण्यात यश आले.