मोस्को : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
रशियाचा पहिला लस स्पुटनिक व्ही कोविड19 संसर्गाविरोधात 97.6 टक्के प्रभावी आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले होते. 3.8 दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवर ही माहिती आधारित आहे. भारताला स्पुटनिक व्ही लसीचे 1.5 लाख डोस प्राप्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी 1.5 लाख डोस पोहचण्याचा अंदाज आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) आज (6 मे 2021) स्पुटनिक लाइट या लसीचा एक डोस वापरण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. स्पुटनिक लाइट लसीचा एक डोस कोरोनाव्हायरस विरोधात 80 टक्के कार्यक्षम असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरडीआयएफच्या मते रशियाच्या गमलेया संस्थेने तयार केलेली लस कोविड 19 विरूद्ध 79.4 टक्के प्रभावी आहे. स्पुटनिक लाईटची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी असणार आहे. सध्या या लसीला फक्त रशियात परवानगी मिळाली आहे. कोरोनाविरोधात स्पुटनिक व्ही जगातली पहिली रजिस्टर्ड होणारी लस होती.
आरडीआयएफने एका निवेदनात म्हटले आहे: “स्पुटनिक लाइट लस दिल्यानंतर 28 दिवसानंतर घेण्यात आलेल्या विश्लेषणात्मक आकडेवारीनुसार 79.4 टक्के या लसीची कार्यक्षमता दिसून आली. रशियाच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 5 डिसेंबर 2020 ते 1 एप्रिल 2021 या कालावधीत हे लसीकरण करण्यात आले होते.