उत्तराखंडातून आलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण; १० लाखांची मागणी

0

धुळे : आमच्याकडे चांगल्या प्रतीचे तांबे आहे. विक्री करायची आहे,’ असे आमिष दाखवून थेट उत्तराखंडातून आलेल्या व्यापारी आकाश अग्रवाल यांना जंगलात डांबून ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या मुक्ततेसाठी १० लाखांची मागणी केली.

या घटनेची माहिती मिळाल्यावर धुळे पोलिसांनी शस्त्रांसह जंगल गाठून आकाश अग्रवाल यांची सिनेस्टाइल सुटका केली. खंडणीखोर मात्र पसार झाले. चित्रपटातील पटकथेला साजेशी घटना धुळे पोलिसांनी धुळीस मिळवली.

उत्तराखंडमधील देहरादून येथील व्यापारी आकाश ईश्वरलाल अग्रवाल यांना उत्तम प्रतीच्या तांब्याचे आमिष दाखवून दोंडाईचात बोलवण्यात आले. यानंतर कथित गणेश नामक भेटलेल्या व्यक्तीने त्यांना मोटारसायकलवर बसवून डोंगराळे येथील जंगलात नेले. या ठिकाणी अग्रवाल यांना मारहाण करण्यात आली. शिवाय त्यांच्या हातातील सुमारे एक लाखाचे महागडे घड्याळ व २० हजारांची रोकड लुटण्यात आली.

लुटारूने अग्रवाल यांचे भागीदार अश्विन तिवारी यांना फोनद्वारे संपर्क साधला. शिवाय अग्रवाल यांच्या सुटकेसाठी १० लाखांच्या खंडणीची मागणी झाली. प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच तिवारी यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने धुळे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी लागलीच पोलिसांना शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसएलआर अर्थात सेल्फ लोडिंग रायफल घेऊन पोलिस डोंगराळेच्या जंगलात शिरले. शोधमोहीम राबवून आकाश अग्रवाल यांची सुटका केली. परंतु खंडणीखोर मात्र पसार झाले.

देहरादून येथील महाकाल ट्रेडर्सचे व्यापारी आश्विन तिवारी यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. साक्री तालुक्यातील जामदा येथून बोलत आहोत. पवन ऊर्जा कंपनीशी संबंधित व्यवसाय आहे. चांगल्या प्रतीची तांब्याची तार विक्री करायची आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर तिवारी यांनी विश्वास ठेवून व्यवहार करण्याचे ठरवले.

Leave A Reply

Your email address will not be published.