अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करुन सात लाख रुपये लाच स्वरूपात स्वीकारले. ‘ACB’च्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही कारवाई आज मंगळवारी डॉलर मोबाइल शॉपी, एस बी आय चौक , यवतमाळ येथे करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल घुगल (52 , पोस्टे लोहारा, जि यवतमाळ (वर्ग- 2)), खाजगी व्यक्ती विद्युत वसानी (रा. यवतमाळ) आणि विशाल माकडे (रा. यवतमाळ) या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे.
तक्रारदार यांचे विरुध्द पोस्टे लोहारा जि यवतमाळ येथे जादू टोणाचा गुन्हा दाखल आहे. या गुह्यामधे तक्रारदार जामिन मिळण्यासाठी, तसा पोलीस अहवाल पाठविण्यासाठी तक्ररदार यांच्याकडे 10 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडी नंतर 7 लाख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभाग, अमरावती कार्यालयात संपर्क साधून तक्रार केली.
ठरल्याप्रमाणे आज मंगळवारी डॉलर मोबाईल शॉपी येथे तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन मध्यस्ती खासगी व्यक्ती यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावतीचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक किशोर म्हसवडे, निरीक्षक विनोद कुजांम, कर्मचारी सुनिल जायभाये, शैलेश कडू यांच्या पथकाने कारवाई केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस उप अधीक्षक यांच्या वतीने करण्यात आले आहे. दुरध्वनी क्रं – 0721-2552355, 2553055
टोल फ्रि क्रं 1064