घटनेनुसार काम करा; राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय करू नका

संजय राऊत यांचा नवीन राज्यपाल बैस यांना सल्ला

0

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिले. मात्र यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यावर केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव होता. मात्र आता नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. अशी अपेक्षा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

संजय राऊत यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्यपालांविरोधात पहिल्यांदा राज्याच्या जनतेने, राजकीय पक्षांनी, संघटनांनी एक भूमिका घेतली. लोक त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले. महाविकास आघाडीचे सरकार असताना 12 आमदारांच्या नावाची यादी त्यांनी मंजूर केली नव्हती. मात्र यात त्यांचा दोष नाही. व्यक्ती वाईट नसते. मात्र त्यांना दबावाखाली काम करावे लागते तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो.

संजय राऊत म्हणाले, नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्या नावात बैस आहे की बायस माहित नाही. मात्र नवीन राज्यपालांचे आम्ही स्वागत करु. मात्र त्यांनी घटनेनुसार काम करावे. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे, राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. बैस हे सुस्वभावी आहेत. मात्र विरोधी पक्षाचा आवाज त्यांनी ऐकावा. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, न्यायालयात याची सुनावणी सुरु आहे. त्यांचे कोणते निर्णय मान्य करावे कोणते नाही, याचे भान त्यांनी ठेवावे.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. त्याचवेळी त्यांना हटवणे गरजेचे होते. मात्र केंद्र सरकारने राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला. सामुदायिक बदल्या झाल्या आणि आत्ता राज्यापालांना हटवले. शिवप्रेमी जनतेवर, महाराष्ट्रावर उपकार केले, असे नाही. भाजपने, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना शेवटपर्यंत पाठिशी घातले. याची नोंद इतिहासात राहिल.

Leave A Reply

Your email address will not be published.