राजवीर हनमंत तोमर (रा. शिवाजी चौक, कोल्हापूर, मूळ रा . सोहनर ता.नडवाल, जिल्हा शिवपूरी , मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली. कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या ट्रॅव्हलमधून अवैधपणे सोने, चांदीच्या दागिन्यांची वाहतूक केली जाणार आहे, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकाला ताबडतोब सूचना दिल्या.
आनेवाडी टोलनाका येथील पुणे बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर नाकाबंदी करण्यात आली. रात्री तीन वाजता आलेली ट्रॅव्हल्स थांबवण्यात आली. तपासणी करण्यात येत असल्याचे सर्व प्रवासी व ड्रायव्हर, क्लीनर यांना सांगितले. त्यानंतर बसची डीकी उघडून झडती घेतली असता, दोन सफेद रंगाच्या गोण्या आढळून आल्या. त्याबाबत चालक व क्लीनरकडे विचारणा केली असता, राजवीर हनमंत तोमर या प्रवाशाची असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गोण्यामध्ये सोन्याचांदीचे दागिने असल्याचे सांगितले. दागिन्यांच्या पावतीबाबत विचारले असता, त्याच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे सांगण्यात आले. हा ऐवज चोरीचा असल्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत १३ लाख ७२ हजार ४०८ रुपयांचे ३४ तोळे सोन्याचे दागिने असल्याचे आढळून आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे, रत्नदीप भंडारे, पोलीस कर्मचारी, विकास गंगावणे, बापूराव धायगुडे, अतुल आवळे, दुदुस्कर, गायकवाड, कदम, वर्णेकर यांनी केली.