नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी बनले वायुदल प्रमुख

0

नांदेड :  जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी भारतीय वायुदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया हे आज (बुधवारी, दि. ३०) सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडून चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. भदौरिया यांनी ४२ वर्ष वायुसेनेत काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय वायुसेनेने ३६ राफेल आणि ८३ स्वदेशी तेजस मार्क ए लढाऊ विमानाचे व्यवहार झाले आहेत. हवाईदल प्रमुख म्हणून मराठी माणसाची वर्णी लागली, त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विवेक राम चौधरी यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि डिफेन्स सर्वीसेज स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन) येथून आपले शिक्षण पूर्ण केले. नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी आणि एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी २९ डिसेंबर १९८२ रोजी भारतीय वायुसेनेत रुजू झाले.

३८ वर्षांच्या सेवेत त्यांनी भारतीय वायुसेनेतील वेगवेगळे लढाऊ आणि प्रशिक्षण एअरक्राफ्ट चालवले. त्यांना मिग-२१, मिग-२३ एमएफ, मिग-२९ आणि सुखोई-३० एमकेआय यांसारख्या विमानांचा ३ हजार ८०० तासांहून अधिक वेळ उडविण्याचा अनुभव आहे. त्यांनी भारतीय वायुदलात विविध पदांवर काम केले आहे.

चीनसोबत सीमा विवाद सुरु असताना लडाख सेक्टरचे प्रमुख माजी लढाऊ विमान पायलट म्हणून चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली होती. चौधरी यांनी सीमा आणि वायुसेनेच्या मुख्यालयात अशा दोन्ही ठिकाणी काम केले आहे. पाकिस्तान विरोधातील ऑपरेशन मेघदूत (सियाचीन अभियान) आणि ऑपरेशन सफेद सागर (१९९९ मधील कारगिल मदत) या वेळी चौधरी यांनी वायुसेनेत महत्वाची भूमिका बजावली आहे. पश्चिमी कमानचे प्रमुख असताना त्यांनी राफेल विमानांना अंबाला एअरबेसवर उतरवले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा राफेल विमानाचे पायलट होता.

सध्या भारताचा चीनसोबत सीमा विवाद सुरु आहे. त्यातच अफगाणिस्तान येथे जी परिस्थिती सध्या सुरु आहे,त्याबाबत संपूर्ण जग परिचित आहे, या सर्व प्रकरणांमध्ये चौधरी यांना काम करावे लागणार आहे. भारतात नव्याने दाखल होणा-या स्वदेशी आणि विदेशी विमानांची जबाबदारी चौधरी यांच्यावर राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.