मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवारांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.
दुसरीकडे, अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा सांगितला आहे. यासंबंधीचे 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे एक पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी 40 आमदारांच्या प्रस्तावाचे दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यात अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे. महत्वाचे म्हणजे या पत्रावर 30 जून ही तारीख आहे. त्यावर निवडणूक आयोगाने आपण दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे शरद पवारांना कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी सादर करण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण सध्या या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहेत.
दुसरीकडे, शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे.
आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष शिवसेनेच्याच वाटेने जात असल्याचे दिसून येत आहे.