काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी जवाहिरीवर ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन मारल्यानंतर जवाहिरीने 2011 मध्ये दहशतवादी संघटनेची सूत्रे हाती घेतली होती.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, हा ड्रोन हल्ला अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या विशेष पथकाने केला. ऑगस्ट 2011 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यापासून जवाहिरी काबूलमध्ये राहत होता. त्याचबरोबर अमेरिकेच्या या कारवाईवर तालिबान संतापले असून त्यांनी हे दोहा कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
अल-जवाहिरीच्या हत्येनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही जवाहिरी याला शोधून मारले. अमेरिका आणि तिथल्या लोकांना निर्माण होणारा कोणताही धोका आम्ही सोडणार नाही. आम्ही अफगाणिस्तानातील दहशतवादावर हल्ला सुरूच ठेवणार आहोत.
11 सप्टेंबर 2001 रोजी 19 दहशतवाद्यांनी 4 व्यावसायिक विमानांचे अपहरण करून अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरला धडक दिली होती. अमेरिकेत हा हल्ला 9/11 म्हणून ओळखला जातो. या हल्ल्यात 93 देशांतील 2 हजार 977 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात ओसामा बिन लादेन, अल जवाहिरी यांच्यासह अल कायदाच्या सर्व दहशतवाद्यांना अमेरिकन तपास संस्थेने आरोपी केले होते.