चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका मजुराला आला. मजुराच्या बँक खात्यात तब्बल 99 कोटी 98 लाख 106 रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला आहे.
सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन किंवा डिजिटल केले जातात. या ऑनलाइन व्यवहारामुळे मजुराच्या बँक खात्यात ‘गुगल पे’द्वारे तब्बल 99 कोटी 98 लाख 106 रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला. ही घटना वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ही घटना चर्चेचा विषय आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा मोबाइलवरील संदेश पाहून मजुरासह गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात ज्या खात्यातून आले होते त्याच खात्यात बँकेच्या माध्यमातून पैसे परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
नागभीड तालुक्यातील मांगली येथील रहिवासी राजू देवरा मेश्राम (40) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्याचे बँक ऑफ इंडियाच्या नागभीड येथील शाखेत खाते असून, त्याच्या या बँक खात्यात ‘गुगल पे’ च्या माध्यमातून 99 कोटी 98 लाख 106 रुपये जमा झाले. तसा संदेश बँकेकडून त्याच्या मोबाइलवर आला.
मेसेज पाहून क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही. त्याने गावात काही नागरिकांनाही याबाबतची माहिती दिली. त्यामुळे गावातही याविषयी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, शुक्रवारी बँक ऑफ इंडियाच्या नागभीड शाखेतून राजू मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी तुमच्या बँक खात्यात 99 कोटी 98 लाख 106 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच इतक्या मोठ्या रक्कमेचे विवरण सादर करण्यास सांगण्यात आले.
बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर राजू मेश्राम घाबरला. लगेच आपल्या एका सहकाऱ्यासह बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, मेश्रामने प्रामाणिकपणाने ही रक्कम आपली नसून चुकून आली असावी. असे बँक अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी नंतर ज्या खात्यातून ती रक्कम आली त्याच खात्यामध्ये ती वळती केली.