बीड : येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या आशा वाघ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाघ यांच्या भावजय व तिच्या नातेवाइकांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत आधी पाठीमागून गळा आवळला व नंतर अंगावर पेट्रोल टाकले. पेटवत असताना आशा यांनी स्वत:ची सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले.
आशा या केज तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागात नायब तहसीलदार आहेत. गावातील १८ गुंठे जमिनीवरून त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ (रा. दोनडिगर, ता.चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्याशी वाद सुरू होता. या शेतीच्या वादातून भाऊ मधुकरने ६ जून २०२२ रोजी सकाळी तहसील कार्यालयातच आशा यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. यात त्या बचावल्या. मधुकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तो बीडच्या कारागृहात आहे.
शुक्रवारी दुपारी बीड रस्त्यावरील बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागे असलेल्या घरी जेवण आटोपून दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास तहसीलकडे जाण्यासाठी निघाल्या. काही अंतरावरच त्यांच्यावर पेट्रोल टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, हल्ला करणारे लोक फरार झाले असून रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.