कराड : चॉकलेटचे आमिष दाखवून आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली. संतोष चंद्रू थोरात (४१, रा. रूवले, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने हा निकाल दिला. कराड न्यायालयाच्या इतिहासात फाशीचा हा पहिलाच निकाल असल्याचे सांगण्यात आले.
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबर २०२१ रोजी गावातील आठ वर्षीय मुलगी त्याच्या घराबाहेर खेळत होती. ती एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत उचलून गावातील निर्जनस्थळी नेत बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी दोषारोपपत्र दाखल केले.पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांत फाशीची शिक्षा लागल्याने बाललैंगिक अत्याचार कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले.