राष्ट्रपती यांच्या खासगी सचिवपदी पुण्याच्या संपदा मेहता यांची नियुक्ती

0

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खासगी सचिवपदी मूळच्या पुणेकर असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) संपदा सुरेश मेहता यांची नियुक्ती झाली आहे. मेहता यांच्या नियुक्तीने प्रशासकीय सेवेतील मराठी चेहऱ्याला राष्ट्रपती भवनात काम करण्याची संधी मिळाली आहे.

मेहता या २००८ च्या ‘आयएसएस’ तुकडीच्या महाराष्ट्र केडरच्या आधिकारी आहेत. या पूर्वी त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी, जीएसटी विभागाच्या मुंबईच्या सहसंचालक तसेच जळगाव, हिंगोली, नाशिकसह विविध जिल्ह्यात काम केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्या दिल्लीत केंद्रीय वित्त विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत.

पुण्यातील हुजूरपागा शाळेत मेहता यांचे शालेय तर, स. प. महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. २००४ साली त्या सीए झाल्या. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून २००८ च्या बॅचमध्ये त्यांची निवड झाली. नव्या नियुक्तीबाबत त्या म्हणाल्या, ‘‘ राष्ट्रपतींबरोबर काम करण्याची संधी मिळणे, हा प्रशासकीय सेवेतील मोठा मान आहे. या पदावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.’’

Leave A Reply

Your email address will not be published.