मुद्दाम दंगली घडवल्या जात आहेत का? : अजित पवार

शांतता राखण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

0

नाशिक : राज्यात मुद्दामहून दंगली घडवल्या जात आहेत का, असा सवाल गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. छत्रपती संभाजीनगरमधील दंगली मागचा मास्टरमाइंड शोधून काढा, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले. ते आज सकाळी नाशिकमध्ये बोलत होते.

सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव निवळला आहे. आम्ही नजर ठेवून आहोत. पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. माझी सगळ्यांना सूचना आहे. कुणीही तणाव करू नये. शांतता ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, प्रत्येक भागातली कायदा – सुव्यवस्था चांगली ठेवणे हे पोलिस यंत्रणेचे काम असते. ही व्यवस्था ठेवताना कुठल्याही राजकीय दबावाखाली यंत्रणेने काम करता कामा नये. काल जो प्रकार झाला. त्यानंतर बंदोबस्त वाढवलेला आहे.काय वस्तूस्थिती घडली. या मागचा मास्टरमाइंड कोण आहे, मुद्दामहून अशा प्रकारच्या दंगली घडवून आणल्या जात आहेत का, उद्याचे काही वेगळा विचार डोळ्यांसमोर ठेवून दोन धर्मामध्ये कसे अंतर वाढेल असा काही प्रयत्न चालला आहे का. हे सगळे पोलिस यंत्रणेने शोधले पाहिजे. आणि ते सगळे थांबवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात गेल्या ४ महिन्यांत निघालेले सुमारे ५० हिंदू जनजागृती मोर्चे व त्यातील भाषणांवरून सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र सरकारला फटकारले. “राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे. मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. याबद्दल अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा उल्लेख केला. ही शिंदे सरकारची नामुष्की आहे. कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर तरी सरकार आत्मपरीक्षण करणार का, असा सवाल त्यांनी केला.

महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होत आहे. त्याबद्दल अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात या नऊ-दहा महिन्यांत ज्या राजकीय घटना महाराष्ट्रात घडल्या. त्यामुळे हे सरकार आले. सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची एक सभा खेडला झाली. ती मालेगावला नाशिक जिल्ह्यात झाली. त्यानंतर सात सभा मविआच्या होत आहेत.सध्या राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.