काबुल : काबुल विमानतळ आणि पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला आहे. तालिबान पंजशीर खोऱ्यावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पंजशीर खोऱ्यासमोर तालिबानी तळ ठोकून होते. शांतीपूर्ण शरण या, असा इशारा पंजशीर खोऱ्यातील नागरिकांना तालिबान्यांनी दिला. पण अहमद मसूद यांच्या सैन्यांनी शरण न जाता तालिबानवर हल्ला चढवला. यामध्ये शेकडो तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला तर अनेकांना बंदिस्त करण्यात आलं आहे. स्थानिक टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, पंजशीर खोऱ्यातील तरुणांनी रात्रीच्या वेळी तालिबान्यांवर हल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त तालिबान्यांचा मृत्यू झाला तर अनेकांना बंदिस्त करण्यात आलं.
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घनी यांनी देशातून पलायन केल्यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला देशाचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले. तालिबानच्या भीतीने अमरुल्लाह सालेह हे अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात लपले आहेत. याला नॉर्दन अलायन्सचे माजी कमांडर अहमद शाह मसूदचा गड मानलं जातं. हा भाग इतका धोकादायक आहे की आजपर्यंत तालिबानीही त्यावर कब्जा करू शकलेले नाहीत. पंजशीर असा एकमात्र प्रदेश आहे ज्यावर आजूनही तालिबानचा कब्जा नाहीए. उत्तर-मध्य अफागणिस्तानच्या या खोऱ्यात १९७० च्या दशकात सोव्हिएत संघ किंवा १९९० च्या दशकात तालिबानला कधीच कब्जा करत आला नाही. काबुल विमानतळ आणि पंजशीर खोरं वगळता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे.
तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानमधील 33 प्रांतावर कब्जा केला आहे. फक्त पंजशीर खोऱ्यात त्यांची सत्ता नाही. तालिबाननं कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाहच्या याच्या नेतृत्त्वाखाली पंजशीरवर हल्ला करण्याकरिता शेकडो दहशतवादी पाठवण्यात आले होते. पंजशीरजवळ बगलान प्रांतातल्या अंदराब खोऱ्यामध्ये लपून बसलेल्या, पंजशीरच्या बंडखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये 300 तालिबान्यांचा खात्मा झाला. यानंतर बगलानमधील देह-ए-सलाह जिल्यातल्याही विद्रोही तरुणांना एकत्र करण्याचं काम सुरु झालं आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून पंजशीर खोऱ्यामध्ये बंडखोर एकत्र येऊ लागले आहेत. अफगाणिस्तानमधील विद्रोही पुढील काही दिवसांत तालिबान्यांवर एकत्रपणे हमला करु शकतात. पंजशीर खोऱ्यात 9000 पेक्षा जास्त तरुण लढाईसाठी तयार असल्याचं वृत्त आहे.
पंजशीर एक निर्सगरम्य खोरं आहे. अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतापैकी हा एक प्रांत आहे. पंजशीर सात जिल्ह्यांमध्ये विखुरलेले असून इथेत ५१२ गावं आहेत. २०२१ च्या जनगणनेनुसार, पंजशीरची लोकसंख्या १ लाख ७३ हजार आहे. बाझारक ही या प्रांताची राजधानी आहे. अमरुल्ला सालेह यांचा अहमद मसूदसोबतचा फोटो सोशल मीडियावरुन समोर आला आहे. अहमद मसूद हा दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. अहमद शाह मसूद हे कट्टर तालिबान विरोधक म्हणून ओळखले जायचे. तालिबान विरोधात लढण्याची तयारी असलेले अफगाण सैनिक पंजशीरमध्ये दाखल होत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. ९/११ हल्ल्याआधी २००१ मध्येच अलकायदा आणि तालिबानने कट रचून अहमद शाह मसूद यांची हत्या घडवून आणली. अहमद शाह मसूद यांचा पंजशीरमध्ये दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मान होता.