कार्यलयातच महिला तहसिलदारावर हल्ला

0

बीड : येथील केज तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने मानेवर आणि डोक्यात वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशा वाघ असं त्या नायब तहसीलदारांचे नाव आहे. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या दरम्यान घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केज येथील महसूल विभागाच्या कार्यरत नायब तहसीलदार आशा वाघ आणि त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ (45, रा. दोनडिगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यात परस्पर शेतीच्या कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता. यानंतर सकाळी 11.30 वाजता मधुकर याने केज तहसील कार्यालयात येऊन आशा वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने आशा वाघ घाबरल्या आणि त्या जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात गेल्या. तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर भावाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती समजताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीसांनी मधुकर याला ताब्यात घेतले. दरम्यान, आशा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.