पिंपरी : वाकड येथील एका जागेवर अनधिकृत ताबा मारल्याप्रकरणी शासकीय अधिकारी जागेची मोजणी करत असताना हा प्रकार घडला. पोलीस बंदोबस्तावरील वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पिस्टलची दोरी ओढून, पळवण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे.
ही घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी पावणे बारा वाजता सखाराम वाघमारे अंडरपास, वाकड येथे घडली. विजय निवृत्ती वाघमारे (60, रा. वाकड गावठाण) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार दीपक गायकवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील एका जमिनीची मोजणी करण्यासाठी बंदोबस्त लावण्याबाबत मंडल अधिकाऱ्यांनी वाकड पोलिसांना अर्ज दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी जागेची मोजणी सुरू असताना आरोपी वाघमारे याने मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर हे देखील उपस्थित होते.
ते बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचा-यांना सूचना करत होते. त्यावेळी आरोपीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देखील शिवीगाळ केली. तसेच मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आला. धक्काबुक्की करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कमरेला असलेल्या पिस्टलची कॉर्ड (दोरी) ओढून आरडाओरडा करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.