नवी दिल्ली ः करोनाच्या नव्या प्रकाराचा वाढता प्रभाव पाहून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत युनायटेड किंग्डममधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून ही बंदी लागू करण्यात आली आहे, असा निर्णय केंद्राने घेतला आहे.
भारतामध्ये करोनाच्या या नव्या प्रकाराचा प्रसार होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये या नव्या प्रकाराच्या विषाणुचे संक्रमण वाढले असल्यामुळे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांनी पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषीत केले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.
२२ डिसेंबरपर्यंत जी विमाने भारतात येणार आहेत, ज्याठिकाणी विमानातील प्रवाशी येतील त्या सर्वांना करोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. विमानतळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
ब्रिटनमधून भारतात येणारी विमाने रद्द करावीत, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काॅंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अभिनेता विपिन शर्मा यांनी व्यक्त केले होते.