माजी आमदार विजयराज शिंदेंना मारहाण, बुलढाण्यात तणावाचे वातावरण

0

बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. मला जर कोरोनाचे जंतू मिळाले असते तर ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते, असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटला आहे. बुलढाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना रविवार (दि.18) दुपारी चारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात रविवारी दुपारी चारच्या सुमारास भाजपचे पदाधिकारी योगेंद्र गोडे, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्यासह भाजपचे काही कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी त्यांचा पुतळा जाण्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. यातून दोन्ही गटामध्ये बाचाबाची होऊन तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये तीन ते चार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या राड्यात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. शिंदे यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनीही या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून माजी आमदार शिंदे यांनीही आपल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात संचारबंदीचा भाग तथा आपत्तीव्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.