पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई लोणावळा परिसरातील आपटे गावात करण्यात आली. अटक करण्यात आलेले सट्टेबाज गुजरातमधील रहिवासी आहेत.
या कारवाईमध्ये 53 हजार रुपये रोख, सहा मोबाईल, लॅपटॉप, टॅब असा एकूण 2 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अजय नटवरलाल मिठीया (47), रवी रसिकभाई रजाणी (26), निपूल देवासीभाई पटेल (28), जिग्नेश गणेशभाई रामाणी (32), मितेश रमेशभाई सिंधू (27, रा. सर्व रा. राजकोट, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यावर आपटे गावातील लेक मॅन्शन बंगल्यात ऑनलाइन सट्टा घेतला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली.
पोलिसांनी लोणावळा परिसरातील आपटे गावातील बंगल्यावर छापा टाकून सट्टेबाजांना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.