वॉशिंग्टन : नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.
अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. ७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष ठरले आहेत. तर कमला हॅरिस या प्रथम महिला उपाध्यक्ष ठरल्या आहेत.
शपथविधी सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी बायडेन यांनी वॉशिंग्टनमधील सेंट मॅथ्यूज कॅथेड्रल चर्चमधील सामूहिक प्रार्थनेला उपस्थिती लावली.