नांदेड : फडणवीसांच्या काळातील म्हणजे 2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्यातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
नांदेडमध्ये उघड झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास आता ईडी करतेय. कृष्णुर इथे उघडकीस आलेल्या या धान्य घोटाळ्यातील आरोपी अजय बाहेती यांना ईडीने अटक केलीय. त्यानंतर आता नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडालीय आहे. याच घोटाळ्यातील आरोपी असलेले अधिकारी गायब झाले आहेत. विशेष म्हणजे ईडीच्या भीतीमुळे या घोटाळ्यातील अनेक जण भूमिगत झाले आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी तपास अधिकारी म्हणून आयपीएस असलेले नरुल हसन यांची नियुक्ती केली होती. पोलिसांनी कारवाईची माहिती आम्हाला दिली नसल्याचा कांगावा महसूलचे अधिकारी करतायत. आपलं काही पितळ उघड पडेल या भीतीने महसूलचे अधिकारी माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. मात्र पोलिसांनी याच धान्य घोटाळ्याच्या संदर्भातला तेरा पानाचा अहवाल महसुल आयुक्ताकडे सादर केला होता.
मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या धान्य घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन बिंग फोडण्याचे धाडस आजतागायत कुणीही दाखवलं नव्हतं, परंतु, आता या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाच्या अधिका-याकडे दिल्याने पोलीस या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचले होते.