मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करिष्माई अर्थात जादुई नेता म्हणून केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांनी गत एप्रिल महिन्यातही मोदींचे कोडकौतुक केले होते. 2 खासदार असणाऱ्या भाजपला मोदींमुळेच 2014 व 2019 मध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यश आले, असे ते म्हणाले होते.
अजित पवार यांनी शुक्रवारी जळगावातील एका राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराल संबोधित केले. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोंड भरून स्तुती केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. मोदी व अमित शहा या 2 नेत्यांुिळेच आज देशातील बहुतांश राज्यांत भाजपचे सरकार आहे.
पवारांनी यावेळी नरेंद्र मोदी व अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळाचीही तुलना केली. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते, मात्र मोदींच्या कार्यामुळे आणि जादूमुळे भाजपने केंद्रात दोनदा स्वबळावर सरकार स्थापन केले. बहुतांश राज्यांतही त्यांचेच सरकार आहे.
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले, पण सोबतच महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती सरकारवर भ्रष्टाचाराचाही आरोप केला. पवार म्हणाले- एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. येथे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही दर ठरलेले आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या घरांवर भ्रष्टाचाराप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे.