भाजपच्या मुलाला लाखो रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

0

बंगळुरू – कर्नाटक साबण आणि डिटर्जंट फॅक्टरी (KSDL) ला रसायनांचा पुरवठा करण्यासाठी निविदा देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रशांत मदल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अटक केली. प्रशांत मदल हा चेन्नागिरीचे भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा आहे.

मदल याला लोकायुक्त पोलिसांनी क्रिसेंट रोडवरील त्याच्या कार्यालयात निविदा इच्छुकांकडून 80 लाख रुपयांची मागणी करताना आणि 40 लाख रुपये स्वीकारताना अटक केली. तपास यंत्रणांनी त्याच्या घराची झडती घेतली असून घरातून 6 कोटी रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी अधिकारी आज पहाटे चार वाजेपर्यंत कारवाई करत होते. पोलिसांनी प्रशांत मदल, त्याचा नातेवाईक सिद्धेश, अकाउंटंट सुरेंद्र, निकोलस आणि गंगाधर यांना अटक केली आहे. लोकायुक्त आयजीपी ए सुब्रमण्यश्वर राव यांनीही प्रशांतच्या कार्यालयाला भेट दिली आहे.

कर्नाटकात साबण आणि डिटर्जंटच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासंदर्भातील टेंडरसाठी प्रशांतने 80 लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई केली आहे. लोकायुक्त पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे.

यापूर्वी देखील घोटाळ्याचे आरोप झाले आहेत

यापूर्वी, प्रशांत मदल 2017 च्या कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (KIRDL) च्या 55 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी देखील आरोपी होता. त्यावेळी या प्रकरणी राज्य सरकारने प्रशांतसह तिघांना निलंबित केले होते. नंतर हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी सुरतकल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती.

भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. ही गोष्ट मला टीव्हीवरच्या बातम्या बघूनच समजली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बरखास्त करून लोकायुक्तांचे अधिकार प्रदान केले आहेत.

लोकायुक्त हे सरकार किंवा प्रशासनाच्या कार्यक्षमता आणि परिणामकारकते विरुद्धच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी राज्य स्तरावर स्थापन केलेले भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरण आहे. त्यानुसार तक्रार दाखल झाल्यानंतर तत्काळ कारवाई केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.