पुणे : पुण्यात बाईकच्या हँडलमधून विषारी असणारा काळा कोब्रा नाग बाहेर पडल्याची घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे बाईकवरून घरी चाललेल्या एका प्राध्यापकांना बाईकच्या हँडलमधून काही विचित्र आवाज येत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी हँडलचं वरचं कव्हर काढून पाहिलं, तेव्हा आतमध्ये काळा नाग असल्याचं त्यांना दिसलं. ते पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली. मात्र कसाबसा धीर एकवटत त्यांनी ती बाईक गॅरेजपर्यंत आणली. अशी घडली घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या निमगाव केतकी गावात ही घटना घडली.
प्रा. सोपान भोंग हे मंगळवारी नेहमीप्रमाणं दिवस मावळल्यानंतर शेतातून घरी चालले होते. मात्र बाईक सुरु करताच त्यांना हँडलमधून विचित्र आवाज येत असल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं.
मात्र काही वेळाने पुन्हा जोरजोराने हा आवाज येऊ लागला. काहीतरी फुसफुसल्यासारखा हा आवाज ऐकून भोंग यांनी गाडी थांबवली. हँडलवरचं कव्हर काढून आतमध्ये पाहतात तर काय ! आतमध्ये एक काळा नाग होता.
हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी ती बाईक दामटत कशीबशी गॅरेजपर्यंत आणली. गॅरेजमधून एका सर्पमित्राला फोन लावण्यात आला. मेकॅनिकनं गाडीच्या हेडलाईटपासूनचा भाग वेगळा केला आणि आतमध्ये अडकून बसलेला नाग बाहेर आला.
सर्पमित्रांनी केली सुटका हँडलमध्ये अडकून बसल्यामुळे हा नाग चांगलाच आक्रमक झाला होता. आपल्या सुटकेसाठी तो प्रयत्न करत होता. जंगलात असणारा साप गावातील शेतात येऊन भोंग यांच्या बाईकच्या हँडलमध्ये कसा अडकला, याचं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तर हा विषारी साप असल्यामुळे तो चावला असता, तर प्राध्यापकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. मात्र प्राध्यापक त्यातून बचावल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.