सातारा : सातार्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघडकीस आले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरची इंजेक्शन आढळून आलेली आहेत. यांच्याकडून एकूण 12 इंजेक्शन जप्त करण्यात आलेली आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी चौथ्या संशयित आरोपीला अटक केली असून तोदेखील सातारचा आहे. दरम्यान, एकीकडे रुग्णांना इंजेक्शन मिळत नसताना संशयित आरोपींकडे इंजेक्शनचे घबाड सापडत असल्याने खळबळ उडाली आहे.
अतुल कठाळे (36, रा. रामाचा गोट, सातारा) असे चौथ्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याअगोदर सौरभ पवार (22, सध्या रा. कृष्णानगर, सातारा) प्रशांत दिनकर सावंत (29) व सपना प्रशांत सावंत (25, दोघे रा.मंगळवार पेठ, सातारा) यांना अटक केली आहे. यातील प्रशांत सावंत हा समर्थ हॉस्पिटलचा कर्मचारी आहे.
चार दिवसांपूर्वी जिल्हा विशेष शाखेने (डीएसबी) प्रशांत सावंत व त्याची पत्नी सपना सावंत यांना अटक करुन त्यांच्याकडून 2 रेमडेसिवीरची इंजेक्शन जप्त केली. संशयित पती पत्नी ते इंजेक्शन 20 हजार रुपयांना विकत असल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे. या दोन्ही संशयितांकडून सौरभ पवार हे तिसरे नाव समोर आले. गुरुवारी त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाचा फास आवळला. या लिंकमध्ये अतुल कठाळे हे चौथे नाव समोर आले. चारही संशयितांकडे तपास सुरु असताना त्यांच्याकडून आणखी धक्कादायक माहिती समोर आली.
यातील सपना सावंत व सौरभ पवार यांनी रेमडेसिवीरचा साठा केला असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी छापासत्र टाकला असता 10 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली. यातील सौरभ याच्याकडून 9 तर सपनाकडून 1 इंजेक्शन जप्त करण्यात आले. अशाप्रकारे आतापर्यंत रेमडेसिवीर काळा बाजारप्रकरणी 12 इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.