मिरज : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबाबत चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तब्बल अडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.31) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. कर्नाटकातून आणलेले हे रक्तचंदन पुढे कोणाला दिले जाणार होते. आणि या गुन्ह्यातील खरा ‘पुष्पा’ कोण याचा शोध पोलीस घेत आहेत.
रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो मिरजमधील गांधी चौक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी वाहन चालक यासीन इनायतउल्ला खान (45 रा. आद्रिकरणहळी, बेंगलोर, कर्नाटक याला अटक करण्यात आली आहे. तब्बल एक टन रक्तचंदन कर्नाटकातून कोल्हापूरला नेले जात होते. पोलिसांना या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जकात नाक्यावर वाहनांची तपासणी करुन रक्तचंदनचा टेम्पो पकडला.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारे एक वाहन सांगली शहरात येणार असल्याची माहिती मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास धामणी रोडवर थांबलेल्या टेम्पोची तपासणी केली. पोलीस व वन विभागाने केलेल्या कारवाईत रक्तचंदनाचे 32 ओंडके आढळले. हे रक्तचंदन फळांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरेटमागे लपवले होते. जप्त केलेले रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 2 कोटी 45 लाख 85 हजार इतकी आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 2 कोटी 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी वाहन चालक यासीन खान याला अटक करुन, रक्तचंदन कुठून आणले, याची चौकशी सुरु आहे. जप्त करण्यात आलेले रक्तचंदन पुढे कोणाला पाठवले जात होते, याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे. सांगली पोलिसांच्या तपासातून रक्तचंदनाच्या तस्करीची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.