मुंबई : महाराष्ट्रात रक्तपात घडवण्याचे काम सुरु आहे. भाजपकडून ठरवून महाराष्ट्राची बरबादी सुरु आहे. मात्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात हे चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप-शिवसेना सरकारला दिला आहे.
अकोल्यात उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोल्या दौऱ्यावर जात आहेत. आपण याठिकाणी वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नाना पटोले म्हणाले, मी आज अकोल्यात झालेल्या हिंसाचाराची वस्तुस्थिती पाहण्यासाठी जात आहे. याठिकाणी माणुसकी संपवण्याचा प्रकार पाहायला मिळाला. पुरोगामी महाराष्ट्रात काँग्रेस हे सहन करणार नाही. लोकांनी बंधुभावाने राहावे, हे समजून सांगण्यासाठी, तसेच शांततेचे आवाहन करण्यासाठी अकोल्यात जात असल्याचे नाना म्हणाले.
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले, संजय राऊतांवर जी हक्कभंगाची प्रक्रिया सुरु आहे. तो प्रक्रियेचा भाग आहे. भाजपने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? ठरवुन महाराष्ट्राची बरबादी भाजपकडून सुरु आहे.
राज्यात रक्तपात करण्याचे काम सध्या केले जात असल्याचा आरोप पटोलेंनी यावेळी केला.
नाना पटोले यांनी यावेळी नुकत्याच मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत प्रतिक्रिया दिली. नाना पटोले म्हणाले, जागावाटपाच्या चर्चा बैठकीत झालेल्या नाही. महाविकास आघाडीत बिघाडी आहे, असे जर कोणी सांगत असेल तर ते चुकीचे आहे.