कोल्हापूर : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर व्यवसायिकाची इन्कम टॅक्स विभागाने चौकशी सुरु केली. हे प्रकरण मोठे असून पुढील कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनेच डॉक्टरकडे पैश्याची गळ घातली. धक्कादायक म्हणजे हे सर्व मॅनेज करण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली आणि अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला.
प्रताप महादेव चव्हाण (रा. सी बोर्ड, कोल्हापूर) असे लाच घेणाऱ्या प्राप्तिकर निरीक्षकाचे नाव आहे. कोल्हापूर येथील एका डॉक्टर विरोधात एक अज्ञात व्यक्तीने प्राप्तिकर विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. या अनुषंगाने प्राप्तिकर विभाकडून संबंधित डॉक्टरची चौकशी सुरु होती. या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकण्याचा इशारा प्रताप चव्हाण याने दिला होता.
प्रताप चव्हाण याने संबंधित डॉक्टरला घरावर छापा न टाकण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागितली होती.
अखेर तडजोडीमध्ये १४ लाख रुपये देण्याचे ठरले होते. मध्यरात्रीपासून तडजोड सुरु होती. याच दरम्यान डॉक्टरेन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. ठरलेल्या रक्कमेपैकी दहा लाख रुपये आज देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्विकारताना चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले.